Pimpri

दापोडीकरांचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्याविरोधात पिंपरीत निषेध मोर्चा

By PCB Author

January 19, 2019

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – दापोडी झोपडपट्टीतील  घरांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात जयभीमनगर, लिंबोरे वस्ती, सिध्दार्थनगर येथील नागरिकांनी  आज (शनिवार) निषेध मोर्चा काढला. यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.

यावेळी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षापासून स्वत:च्या नावाने सातबारा व घरपट्टी भरत असलेल्या जयभीमनगर येथील नागरिकांच्या जागेवर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुनर्वसन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातून नागरिकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जात आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प राबविला जात आहे, अशी तक्रार येथील नागरिकांनी करून प्रशासनाच्या निषेधार्थ हा मो्र्चा काढण्यात आला.

अनेक नागरिकांची एक ते चार गुंठ्यापेक्षा जास्त जागांचा मालकी हक्क आहे. यावर अनेक दुमजली घरे बांधण्यात आलेली आहेत. काहींची जास्त चटई क्षेत्र असलेली घरे असून त्यांना सरकारकडून केवळ २६९ चौरस फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला नागरिकांनी कडाडून विरोध केला जात आहे.