Maharashtra

दानवेंच्याविरोधात लोकसभा लढवणारच; उध्दव ठाकरेंच्या भेटीनंतर पुढील निर्णय घेणार – अर्जुन खोतकर 

By PCB Author

February 20, 2019

जालना, दि. २० (पीसीबी) – राज्यात शिवसेना-भाजप युती झाली असली तरी, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार पक्का आहे,  असे म्हटले आहे.  येत्या दोन दिवसांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे खोतकर यांनी सांगितले.  

अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यात विळ्या भोपळ्याचे वैर आहे.  त्यामुळेच खोतकर यांनी जालना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे घोषित  केले. यामुळे   दानवे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. खोतकर यांनी आपण अद्याप मैदान सोडले नाही, असे सांगत निवडणूक लढवण्यावर ठाम आहे,  असे म्हटले आहे.

आपण इतर पक्षात जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र या चर्चा निराधार आहेत, असेही खोतकर यांनी  स्पष्ट केले आहे.  निवडणूक काळात अशा वावड्या उठतच असतात. त्यामुळे त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असेही खोतकर यांनी सांगितले.