Banner News

दाऊद पाकिस्तानातच, खुद्द पाकचीच कबुली

By PCB Author

August 22, 2020

कराची, दि. २२ (पीसीबी) – दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांच्या यादीमध्ये पाकिस्तानने अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश केला आहे. पाकिस्तान आतापर्यंत अनेक वर्ष दाऊद त्यांच्या इथे नसल्याचा दावा करत होता. पण आज त्यांनी अखेर दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश केला आहे. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे दाखवले आहे.

पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता दिला आहे. पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंधांची कारवाई केली आहे. त्यात दाऊदच्या नावाचा समावेश आहे. निर्बंधांच्या यादीत दाऊदचे नाव आणि पत्त्याचा समावेश करणे, याचाच अर्थ १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी आमच्या इथे राहत असल्याची पाकिस्तानने कबुली देणे आहे.

डी गँगच्या म्होरक्याला आसरा देत असल्याबद्दल भारताने आतापर्यंत वेगवेगळया जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानला नेहमीच लक्ष्य केले आहे. दहशतवादाला पैसा आणि अन्य माध्यमातून खतपाणी घालणाऱ्या देशांवर FATF चे बारीक लक्ष असते. या संघटनेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने कारवाई केल्याचे दाखवले आहे. हाफीज सईद, मसूद अझर या दहशतवाद्यांवर सुद्धा पाकिस्तानने निर्बंधांची कारवाई केली आहे. पॅरिस स्थित FATF संघटनेने जून २०१८ साली पाकिस्तानचा ग्रे यादीत समावेश केला. पाकिस्तानने निर्बंध घातलेल्या ८८ संघटनांमध्ये भारतविरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी आणि संघटनांचा समावेश आहे.