Maharashtra

दाऊद इब्राहिमच्या साथीदाराशी व्यवहार केल्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल ईडीच्या निशाण्यावर

By PCB Author

October 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एका साथीदाराशी  आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा ईडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी  मुंबईपासून ते बेंगळुरूपर्यंत ११ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे.

‘मिर्ची’ नावाने कुख्यात दिवंगत इकबाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केला होता. पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘मिर्ची’मध्ये झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे.

पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीकडून ‘मिर्ची’ ला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरू तारांगणच्या समोर प्राइम लोकेशनला आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधली. या इमारतीचे नाव ‘सीजे हाउस’ असे आहे.

डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीने १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. इकबाल मेमम म्हणजे ‘मिर्ची’ची पत्नी हजरा मेमन यांच्या नावे असलेला प्लॉट पटेल कुटुंबाच्या कंपनीच्या नावे करण्यात आला, या संबंधितांची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत.