दहा रुपयांचे नाणे न स्विकारणे दुकानदाराला भोवले; न्यायालयाने ठोठावला २०० रुपये दंड आणि न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा

0
743

मुरैना, दि. १ (पीसीबी) – मध्य प्रदेशच्या एका दुकानदाराला ग्राहकाकडून १० रुपयांचे नाणे न स्विकारणे चांगलेच महागात पडले आहे. कलेक्टरच्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्याला मुरैना जिल्ह्यातील स्थानीक न्यायालयाने दोषी ठरवत २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण जैन या दुकानदाराने आकाश नावाच्या ग्राहकाकडून १० रुपयांची दोन नाणी घ्यायला नकार दिला होता. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी आकाशने जैन यांच्या दुकानातून दोन रुमाल खरेदी केले, त्यासाठी आकाशने जैन यांना १० रुपयांची दोन नाणी देऊ केली, पण जैन यांनी ही नाणी आता चलनात नाहीयेत असे सांगत ती स्वीकारण्यास नकार दिला. यावर आकाशने पोलीस स्थानकात दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुकानदार अरुण जैन याला मुरैना जिल्ह्यातील स्थानीक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोषी ठरवत २०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातच बसून राहण्याची शिक्षाही दिली.