‘दहा’ नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी

0
321

पुणे, दि.५ (पीसीबी) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसराचा वाढता विस्तार विचारात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील पोलीस ठाणी शहर पोलिसांच्या अखत्यारीत समाविष्ट करण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पुणे पोलीस आयुक्तालयात वाघोली, उरूळी कांचन, नांदेड सिटी, बाणेर, काळेपडळ, फुरसुंगी, खराडी तसेच पिंपरी पोलीस आयुक्तालयात म्हाळुंगे, रावेत, शिरगाव अशा दहा पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली.

पुणे आणि पिंपरी शहराला लागून असलेल्या भागात वाढती गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन दहा नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख तसेच शिरूरचे आमदार अशोक पवार, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, हडपसरचे आमदार चेतन तुपे, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शिरूरमध्ये पोलीस उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यास या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांना वाहन खरेदीसाठी एक कोटी व पिंपरी पोलीस आयुक्तालयासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस व नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हायला हवे, असे पवार यांनी सांगितले.