दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारुन माझे सुतक संपवले; साध्वी प्रज्ञांचे वादग्रस्त विधान

0
735

भोपाळ, दि. १९ (पीसीबी) – मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी माझ्याविरोधात पुरावे नसतानाही मला तुरुंगात ठेवले. हेमंत करकरे यांनी साध्वीला सोडणार नाही असे म्हटले होते. हा देशद्रोह होता, धर्मद्रोह होता. मी त्यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. मी खूप त्रास सहन केला. मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य केले. साध्वी प्रज्ञासिंह या भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असून त्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. “तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की, मी काहीही करेन, पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही”, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरे जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावे लागेल का. यावर मी म्हटले की तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले, असे वादग्रस्त विधान साध्वींनी केले.