Desh

दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान – नरेंद्र मोदी

By PCB Author

November 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे ११ व्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आणि त्यामुळे जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे व्यापाराची मोठी हानी झाली, असे मत मोदी यांनी गुरुवारी ब्रिक्स परिषदेत व्यक्त केले.

ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत ब्रिक्सच्या सत्रामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, विकास, शांतता आणि भरभराट यांना दहशतवादाचा सर्वात मोठा धोका आहे. दहशतवादामुळे विकसनशील देशांची आर्थिक वृद्धी १.५ टक्क्यांनी कमी झाली आहे. दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.

गेल्या १० वर्षांत दहशतवादाने २.२५ लाख जणांचे बळी घेतले आणि समाजाचा नाश केला. दहशतवाद, दहशतवादाला करण्यात येणारे आर्थिक साहाय्य, अमली पदार्थाची तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याचा अप्रत्यक्षपणे व्यापारावर परिणाम झाला, असे मोदी म्हणाले.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ब्रिक्सच्या रणनीतीवर पहिलेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले त्याबद्दल आपल्याला आनंद आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे आणि कृतींमुळे  दहशतवाद आणि अन्य संघटित गुन्ह्य़ांविरुद्ध शक्तिशाली ब्रिक्स सुरक्षा सहकार्य वृद्धिंगत होईल, असे ते म्हणाले.