दसरा मेळाव्याला राजकीय स्वरूप नसेल – पंकजा मुंडे

0
439

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रसंत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील तिसऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याच्या नियोजनासाठी बठक घेऊन भगवानबाबांच्या जन्मभूमीत सीमोल्लंघन ही परंपरा महत्त्वाची असून ती भव्यच असली पाहिजे, असे प्रतिपादन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मेळावा होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. त्या अनुषंगाने या मेळाव्याला राजकीय स्वरूप नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावरगाव घाट येथे विजयादशमीनिमित्त ८ ऑक्टोबर रोजी ‘दसरा मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. संत भगवानबाबांची कर्मभूमी असलेल्या भगवानगडावर होणाऱ्या मेळाव्यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे भाषण व्हायचे. ऊसतोड मजूर आणि समाजाला दिशा, ऊर्जा देण्याचे काम याच मेळाव्यातून होत असे. मात्र गडावर राजकीय भाषण नाही अशी भूमिका गडाच्या महंतांनी घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला. त्यानंतर मात्र भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे त्यांनी मेळाव्याला सुरुवात केली. या वर्षी होत असलेला हा तिसरा मेळावा आहे. सावरगाव घाटला पंकजा मुंडे यांनी ‘भगवान भक्तिगड’ असे नाव देऊन विकसित केले आहे. भगवान भक्तिगडाचे वैशिष्टय़ म्हणजे राष्ट्रसंत भगवानबाबांची पाण्यात बसून ज्ञानेश्वरी वाचत असलेली भव्य मूर्ती. ८ ऑक्टोबर रोजी याच भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा होत असून मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे या तेथे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याच्या अनुषंगाने भाविकांनीच पंकजा मुंडे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले. मेळाव्याला कुठलेही राजकीय स्वरूप नसेल असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. यंदाच्या मेळाव्यातही महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी राज्यातून भाविकांची उपस्थिती राहणार आहे.