Banner News

दरड हटवण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर १२ ते २० मार्चपर्यंत ब्लॉक

By PCB Author

March 12, 2019

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड हटवण्यासाठी १२ ते २० मार्च यादरम्यान ब्लॉक घेतले जाणार आहेत. खंडाळा बोगद्याजवळ दर तासाला १५ मिनिटांचा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी ब्लॉक दरम्यान काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ ते २० मार्च यादरम्यान पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

द्रुतगती महामार्गावर सकाळी दहा ते सव्वा दहा, सकाळी अकरा ते सव्वा अकरा, दुपारी बारा ते सव्वा बारा, दुपारी दोन ते सव्वा दोन आणि दुपारी तीन ते सव्वा तीन या वेळेत ब्लॉक घेतले जाणार आहेत. तसेच शुक्रवार ते सोमवार या वीकेंड आणि वीकेंडभोवतालच्या दिवसात द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा ताण येतो. त्यामुळे शुक्रवारी म्हणजे १५ मार्च रोजी दुपारी सव्वा तीन ते सोमवार म्हणजे १८ मार्चपर्यंत द्रुतगती मार्ग दुपारी १२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला राहील.