दगडफेक, तलवार कोयत्याने वाहनाची तोडफोड; दोघांवर खुनी हल्ला

0
813

पिंपरी – चिंचवडमधील वाहनांच्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री पिंपरीतील नेहरूनगर आणि रहाटणी येथे टोळक्याने दगडफेक करत तलवार आणि कोयत्याने काही वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात खुनी हल्ला, दंगल करणे या कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. टोळक्याचा धुडगूसाची पहिली घटना नेहरूनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली .

नीलेश सुभाष जाधव (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आशिष जगधने (वय ३१), इरफान शेख (वय ३०), जितेश मंजुळे (वय २८), जावेद औटी (वय २९), आकाश हजारे (वय ३०) व त्यांचे इतर ९५ साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे यांचे नेहरूनगर येथे कार्यालय आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे ऑफिसमोर पार्क केलेल्या कारमध्ये लॅपटॉप ठेवण्यासाठी गेले. त्यावेळी सुमारे १०० जण कार आणि दुचाकीवरून डबल-ट्रिपल सीट आले. सर्व आरोपींच्या हातामध्ये तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंटचे ब्लॉक, दगड, विटा होत्या.

त्यातील कोणीतरी एकाने फिर्यादी यांच्याकडे बोट दाखवून ‘हा होता का? असा ओरडला. काही जण म्हणाले ‘अरे याला आता जिवंत सोडायचे नाही. याला संपवून टाकू’, असे म्हणत त्यातील एकाने फिर्यादीच्या डोक्यात तलवार मारत असताना तो वार चुकवून फिर्यादी पळू लागले. आरोपीने फिर्यादी यांच्या पाठीवर तलवारीने वार केला. त्यावेळी इतर आरोपींनी फिर्यादी जाधव यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने सिमेंटचे ब्लॉक डोक्यात मारले. फिर्यादी जाधव यांनी आपला उजवा हात डोक्यावर धरला. त्यावेळी आरोपींच्या टोळक्याने उजव्या हातावर पाठीवर मानेवर डोक्यावर दगडाने मारा केला. त्यावेळी काही आरोपी मोठमोठ्याने ओरडून म्हणत होते की “कोणामध्ये दम असेल तर त्यांनी बाहेर या”. टोळक्याकडून धुडगूस सुरू असल्याने आसपासचे लोक सैरावैरा पळू लागले. स्थानिकांनी आपली दुकाने बंद करून घेतली. टोळक्याने तेथे पार्क असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा नेहरूनगर परिसरात दाखल झाला. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वतः घटनास्थळाला भेट दिली.तोडफोडीच्या दुसऱ्या घटनेत आकाश दत्तात्रय जाधव (वय २३, रा. जयभवानी चौक, श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम निवृत्ती कवठेकर, राहुल हिवराज उके, दीपक नाथा मिसाळ, मंगेश मोतीलाल सकपाळ, सूरज बाळू पाटाळे, कैलास हरिभाऊ वंजारी, आकाश महादेव कांबळे आणि सनी गवारे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आकाश हे आपल्या घराच्या बाहेर कट्ट्यावर बसलेले होते. त्यावेळी आरोपी शुभम कवठेकर याने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी आकाश यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. आरोपी राहुल उके, दीपक मिसाळ, मंगेश सकपाळ यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ केली. तसेच हातातील कोयते दाखवून आरोपी सुरेश पाटोळे, कैलास वंजारी, आकाश कांबळे, सनी गवारे यांनी हातामध्ये दगड घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादी आकाश यांच्या घराच्या खिडकीची काच व महापालिकेचा पथदिव्यांवर दगडफेक करून नुकसान केले. आरोपी दीपक मिसाव याने फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. सदर भागात दहशत निर्माण करून आरोपीस दुचाकीवरून पळून गेले.