दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा हल्ला; दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू   

0
539

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – छत्तीसगड येथील दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शनच्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कॅमेरामन आणि दोन जवानांचा मृत्यू झाला. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यासाठी दूरदर्शनचे पथक  दंतेवाडा येथे गेले होते. दंतेवाडा येथील अरणपूर जंगलात हा हल्ला झाला.

जवानांचे एक पथक घटनास्थळी रवाना केले आहे. मृतांमध्ये उपनिरीक्षक रूद्रप्रताप, सहाय्यक कॉन्स्टेबल मंगलू आणि डीडी न्यूजचे दिल्लीतील कॅमेरामन अच्युतनंद यांचा समावेश आहे, अशी माहिती नक्षलवादविरोधी अभियानाचे प्रमुख पी सुंदर राज यांनी दिली.

दरम्यान, या हल्ल्यानंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १११ सीआरपीएफ बटालियनचे जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरूंगाच्या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले होते.