थेरगावात २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी शासन आपल्या दारी शिबीराचे आयोजन; १०० रुपयांत मिळणार गॅस कनेक्शन

0
746

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – संजय गांधी निराधार योजना समिती चिंचवड विधानसभा, अप्पर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड, मुळशी तहसील कार्यालय, अन्नधान्य वितरण विभाग, रतन गॅस एजन्सी, आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अंध, अपंग, मुकबधीर, कर्णबधीर, विधवा व घटस्फोटित महिला, मुलगा नसलेले ज्येष्ठ नागरिक व मागासवर्गातील नागरिकांना १०० रुपयांत गॅस कनेक्शन देण्यासाठी शनिवारी (दि. २२) आणि रविवारी (दि. २३) थेरगाव येथील अनुसया मंगल कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. तापकीरनगर ते डांगे चौक रस्त्यावर थेरगावातील अनुसया मंगला कार्यालयात हे शिबीर होणार आहे. याबाबत संजय गांधी निराधार योजना समिती चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष नरेंद्र माने यांनी माहिती दिली. या शिबीराला रहाटणी, सांगवी, पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, देहूरोडचे तलाठी तसेच मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, महा ई-सेवा केंद्र आणि अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. ती सरकारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी सर्वसामान्यांना वेळ लागतो. सामान्यांचा हा त्रास कमी व्हावा तसेच त्यांनी जागेवरच कागदपत्रे मिळावीत यासाठी या शिबीराच्या माध्यमातून एकाच ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबीरात तलाठी दाखला, रिपोर्ट, जबाब, मंडल अधिकारी यांचा अहवाल, तहसीलदारांचा उत्पन्न दाखला, प्रतिज्ञापत्र तसेच १०० रुपयांत उज्ज्वला गॅस कनेक्शन महिलांच्या नावे जागेवरच उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थींनी येताना आधारकार्ड, रेशनकार्ड, दोन फोटो, विजेचे बिल, पतीचा मृत्यूचा दाखला, अपंग दाखला, मुलांचे बोनाफाईड किंवा जन्म दाखला, स्वतःच्या वयाचा पुरावा सोबत घेऊन यावेत, असे आवाहन नरेंद्र माने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अदिती (9762353637), माने (9309773982), मळेकर (9822646130) यांच्याशी संपर्क साधावा.