Chinchwad

थेरगावात सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

November 21, 2018

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास थेरगावातील गुजरनगर कॉलनी येथील घरात घडली.

सायली आहेर (वय २०, रा. थेरगाव, गुजरनगर कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या ६० वर्षीय आजीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती करण आहेर, सासरा अर्जुन आहेर, दीर आणि दोन नणंद (सर्व रा. गुजरनगर कॉलनी, डांगे चौक, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आणि करण यांचा ११ मे २०१८ रोजी विवाह झाला होता. यावेळी आहेर कुटूंबीयांना सायलीच्या घरच्यांनी ३ लाख रुपये रोख, करणच्या कपड्यांसाठी आणि दागिन्यांसाठी दिड लाख रुपये दिले होते. मात्र करणच्या एका बहिणीला मना प्रमाणे नवरा भेटला नाही म्हणून ती माहेरीच राहत होती. ती माहेरी नांदायलाजात नाही म्हणून आहेर कुटूंबीयांनी सायलीचा छळ सुरु केला. तसेच तिच्या घरच्यांना आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाही अशी धमकी दिली. तसेच हुंडा म्हणून मोटार सायकल घेण्यासाठी सायलीच्या कुटूंबीयांकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर वारंवार घरातील काम करायला लावून उपाशी ठेवले आणि तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केला. या सर्व प्रकाराला कंटाळून सायलीने राहत्या घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात आहेर कुटूंबीयांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दिघी पोलीस तपास करत आहेत.