थेरगावातील पदमजी पेपर मिलच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0
428

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची पर्यावरण मंत्र्याकडे मागणी

पिंपरी,दि.27(पीसीबी) – थेरगावातील पदमजी पेपर मिलमध्ये बॉयलरसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशाची घाण आजूबाजूच्या नागरीवस्ती मध्ये जात आहे. घरांमध्ये, घराच्या छतावर, बाल्कनी, रस्त्यावर काळी धूळ जाते. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वासनाचे विकार वाढले आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, वृद्धाना त्याचा खूप त्रास होत आहे. प्रदूषण करणाऱ्या या कंपनीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिव मनीषा म्हस्कर, पुणे प्रदूषण नियामक मंडळाचे कार्यालय आणि पिंपरी महापालिकेलाही पत्र पाठविले आहे. कंपनीतील बॉयलर प्लांटची चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, थेरगावात पदमजी पेपर मिलचा बॉयलर प्लान्ट आहे. त्यासाठी दगडी कोळसा वापरला जातो. त्याची धूळ हवेत उडते. त्यामुळे प्रदूषण होत आहे. ती धूळ आजूबाजूच्या घरांपर्यंत जाते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रस्ते, घरांवर काळ्या धुळीचा थर येतो. लहान मुले, वृद्धांना त्याचा खूप त्रास होत आहे. श्वसनाचे आजार होत आहेत. कंपनी कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही. तक्रार केली तर, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

पदमजी पेपर मिल पहिल्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करत आहे. पवना नदीत प्लांटचे रसायनमिश्रित पाणी सोडले होते. त्यामुळे मिलवर यापूर्वी कारवाई देखील केली होती. त्यांनतर नदीत पाणी सोडणारा प्लांट प्रदूषण मंडळाने बंद केला होता. आता कोळशावरून वीज निर्मिती करत आहेत. ती वीज कंपनीला वापरत आहेत. त्याची धूळ मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळते. चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरापर्यंत धूळ जाते. याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या. पण, कंपनी त्याकडे दुर्लक्ष करते.

थेरगाव परिसरात सुरुवातीला नागरीकरण नव्हते. आता मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. अस्थमा आजाराचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे नागरिकांना श्वसनाचा विकार जडला आहे. त्यातच कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.