थेरगावमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपान करण्यापासून रोखल्याने हॉटेल व्यावसायिकाला जीवेमारण्याची धमकी

0
467

थेरगाव, दि. १६ (पीसीबी) – रात्री उशिरापर्यंत मद्यपान करण्यापासून रोखल्याने एका हॉटेल व्यावसायिकाला तिघा जणांनी मिळून शिवीगाळ करत जीवेमारण्याची धमकी दिली. तसेच त्या व्यावसायिकाची दुचाकीची देखील तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. १४) रात्री बाराच्या सुमारास डांगे चौक थेरगाव येथील सागर बारमध्ये घडली.

याप्रकरणी सागर संभाजी कांबळे (वय २८, रा. एकता कॉलनी, गणेश नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराज दशरथ माने (वय २५, रा. तापकीर नगर काळेवाडी), अक्षय सुधीर भोसले (वय २४, रा. पंढरपूर), गणेश अशोक मदने (वय २२, रा. माण, मुळशी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास तिघे आरोपी हे डांगे चौक येथील सागर बारमध्ये मद्यापान करत होते. रात्री बारावाजून गेल्याने त्यांना तक्रारदार हॉटेल मालक यांनी ‘खूप उशीर झाला आहे, मला हॉटेल बंद करायचे आहे, त्यामुळे तुम्ही उरका’ असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी सागर कांबळे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली.  आरोपी सध्या फरार आहेत. वाकड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.