Chinchwad

थेरगावमध्ये पडलेली टोपी उचलून दिली म्हणून तरुणावर चाकुने वार

By PCB Author

March 05, 2019

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – दुचाकीवरून जात असताना समोरच्या दुचाकीस्वाराची टोपी हवेने उडून रस्त्यावर पडली. हे पाहून मागून दुचाकीवरुन येणाऱ्या तरुणाने मदत म्हणून रस्त्यावर पडलेली टोपी उचलून त्या दुचाकीस्वाराला दिली. मात्र तिघांनी मिळून त्या मदत करणाऱ्या तरुणालाच शिवीगाळ करून चाकूने वार केले. ही घटना रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

महेश सुधाकर पवार (वय २५, रा. सेनापती बापट रोड, पुणे) असे चाकुचे वार होऊन जखमी झालेल्या  तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महेश आणि त्याचा मित्र दिनेश सुर्वे हे दोघेजण दुचाकीवरून जात होते. ते थेरगाव येथील गव्हाणे हॉस्पिटल समोरून जात असताना त्यांच्या पुढे एका दुचाकीवरून तीनजण जात होते. त्यातील एकाची टोपी रस्त्यावर पडली. समोरच्या दुचाकीस्वाराला मागे वळून यावे लागू नये यासाठी महेश यांनी टोपी उचलून आरोपी तरूणाला दिली. त्यावरून तिघा आरोपींनी महेश यांना शिवीगाळ करत चाकूने मारले. यामध्ये महेश जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करत आहेत.