Pune Gramin

थरारक: तळेगावात जमिनीच्या वादातून एकाच्या गळ्याचा घेतला कडकडून चावा

By PCB Author

February 13, 2019

तळेगाव, दि. १३ (पीसीबी) – जमिनीचे जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करत असताना एका इसमाने दुसऱ्या इसमाला धमकावत त्याच्या गळ्याचा कडकडून चावा घेतल्याची थरारक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.११) दुपारी दिडच्या सुमारास तळेगाव जवळील मौजे पुसाणे गावाच्या हद्दीत घडली.

शाम लक्ष्मण वाजे (वय ५५, रा. शेलारवाडी, ता. मावळ) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बबन दगडु वाजे आणि रामचंद्र सखाराम वाजे (रा. शेलारवाडी, मावळ) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास फिर्यादी शाम वाजे हे त्यांच्या जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्याचे काम करत होते. यावेळी त्यांच्या भावकीतील बबन आणि रामचंद्र हे दोघे तेथे पोहचले. त्यांच्यात शाबदीक वाद झाला. यामुळे आरोपी बबन याने शाम यांच्या गळ्याचा कडकडून चावा घेतला तर रामचंद्र याने शिवीगाळ करत शाम यांना धमकावले. आरोपी बबन आणि रामचंद्र या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.