थकबाकी न भरल्याने तेल कंपन्यांनी थांबवला एअर इंडियाचा इंधन पुरवठा

0
578

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडिया या सरकारी प्रवासी विमान कंपनीला गुरुवारी मोठा धक्का बसला. मागील थकबाकी न भरल्याने तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवर या विमानांसाठीचा इंधन पुरवठा रोखला आहे. मात्र, याचा एअर इंडियाच्या विमानांच्या उड्डाणावर याचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एअर इंडियाचे प्रवक्त्याने सांगितले की, आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया मोठ्या प्रमाणावरील कर्जाचे उत्तरदायित्व हाताळू शकत नाही. मात्र, तरीही एक आशादायी चित्र असे आहे की, या अर्थिक वर्षातील आमची आर्थिक कामगिरी ही खूपच चांगली राहिली आहे. कंपनी आता फायद्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास विविध राज्यांतील तेल कंपन्यांनी देशातील सहा विमानतळांवरील एअर इंडियाच्या विमानांसाठीचा इंधन पुरवठा थांबवला. यामध्ये कोचीन, विशाखापट्टणम, मोहाली, रांची आणि पुणे या विमानतळांचा समावेश आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.

एअर इंडियावर सध्या सुमारे ४८,००० कोटींचे कर्ज आहे. गेल्या वर्षी सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के भाग-भांडवल निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. मात्र, ही भाग-भांडवल विक्री प्रक्रिया अपयशी ठरली होती.