‘त्या’ फेक ऑडिओ क्लिपमुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मनस्ताप

0
1777

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ठाण्यातील मीरारोड येथील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावे एक खोटी ऑडिओ क्लिप तयार करुन ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे शहीद मेजर कौस्तुभ यांच्या पत्नीसह कुटुंबियांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, ती ऑडिओ क्लिप आपण केली नसल्याचा खुलासा वीरपत्नी कनिका राणे यांनी केला आहे.

शहीद कौस्तुभ यांच्या निधनाने बसलेल्या धक्क्यातून अद्याप आपण सावरलेलो नाही. अशाप्रकारे पत्र लिहावे किंवा क्लिप तयार करावी, असे आमच्या मनातही आलेले नाही. कुठलीही ऑडिओ क्लीप तयार करण्याची आपली मनस्थिती नसल्याचे कनिका यांनी सांगितले.

तर दुसरीकडे, काही जणांनी सोशल मीडियावर आव्हान करत शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या नावे निधी जमवण्यास सुरुवात केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगत काही जण पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या कुटुंबीयांना अत्यंत दुःख होत आहे.

अशाप्रकारे कुठलाही निधी आपण जमवत नाही. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न कृपया करु नये, अशी कळकळीची विनंती राणे कुटुंबाने केली आहे.