`त्या` पोलिस आयुक्तांवर २०० कोटी वसुलीचा आरोप

0
768

लेटरबॉम्ब मुळे पोलिस वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ
– पत्र तद्दन खोटी, बदनामीकारक – कृष्ण प्रकाश

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संबंधी असलेल्या एका लेटर बॉम्ब ने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. सह पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. यात चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इत्यादिंचा समावेश आहे. जवळपास अशाच आशयाचे दुसरे एक पत्र आमदार अण्णा बनसोडे यांच्या लेटरपॅडवर सद्याचे पोलिस आयुक्तअंकुश शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, कृष्ण प्रकाश यांच्याकडे विचारणा कली असता ते म्हणाले, दोन्ही पत्रांतील सगळे आरोप तद्दन खोटे आहेत. दोन्ही पत्रांमधील मॅटर एकसारखा आहे. यापूर्वीही अशाच प्रकारचे एक पत्र चौकशिसाठी आले होते. हे कऱणारे काही पोलिसमधीलच लोक आहेत. ज्या लोकांवर मी कारवाई केली त्यांनीच हे कारस्थान केले असावे. या पत्रांची सखोल चौकशी करण्याबाबातची तक्रार अशोक डोंगरे यांनी दाखल केली आहे. आमदार बनसोडे यांच्याशी आपले बोलणे झाले असून त्यांनी असे कोणतेही पत्र दिलेले नसल्याचे असे मला सांगितल्याचे कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं बोललं जातं आहे. डोंगरे यांचं अर्जदार म्हणून नाव आहे. प्रत्यक्षात मात्र हे पत्र आपण लिहिलं नाही आणि त्याबाबत मी एक तक्रार दाखल करत असल्याचे स्वतः डोंगरे यांनी पीसीबी टुडे बरोबर बोलताना सांगितले.

आमदार बनसोडे यांच्याशी त्यांच्या नावाने लिहीलेल्या पत्राबाबत जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. पण पदाने कनिष्ठ असल्याने सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची. या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावं लागतं होत. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत. या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले. मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे. यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळं मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास दिललेला नाही. त्यामुळं आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही अस सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबदार ठाम आहे, असं या व्हायरल पत्रात लिहिलेलं आहे.

पत्रात महत्वाचे आरोप काय आहेत?
– सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना एका बड्या वकिल संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले.
– पिंपरीतील एका बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले.
– आयुक्तांच्या वर्षपूर्तीनिमित राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा खर्च हिंजवडी आणि मावळ मधील बांधकाम व्यवसायिकाने केला होता.