…. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की अजित पवारांमुळे टळली.

0
359
मुंबई, दि.२८ (पीसीबी) – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरून चितपट करण्याचा डाव मांडला होता. ठाकरे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे सांगत विरोधकांचा डाव हाणून पाडला.
मात्र यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे ३५ लाख शेतकाऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचे यांनी सांगितले. तेव्हा, मुख्यमंत्री चुकल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या लक्षात येताच ठाकरेंना सावरत अजित पवारांनी नेमका खुलासा केला. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या आकड्यांवरून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की अजित पवारांमुळे टळली.
यावेळी झाले असे की, पत्रकारांनी ३५ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर मान हलवून मुख्यमंत्री ठाकरेंनी होकार दिला. मात्र अजित पवार यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी यावर खुलासा करत ही बँक खाती असल्याची बाब निदर्शनास आणून दिले, आणि इतक्या लोकांना कर्जमाफी नव्हे, तर त्यांची खाती तपासून, पात्रता यादी जाहीर केली जाईल,”असा खुलासा केला त्यामुळे ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराआधीही आपल्या हातातील काही कागदपत्रे दाखवनू नेमका विषय काय आहे? यावरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी अजितदादांशी चर्चा केली. अर्थात, सरकारमधील बारकावे, त्यांची मांडणी आणि परिणाम, अशा साऱ्या बाबींवर मुख्यमंत्री ठाकरे हे अजितदादांचाच सल्ला घेत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले.
दरम्यान, ठाकरे सरकारच्या पहिल्या पूर्णवेळ अधिवेशनात विशेषत: शेती, कर्जमाफी, महिला अत्याचार या प्रमुख मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधी पक्ष भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी आखली होती. मात्र कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याचे सांगत, मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांच्या रणनीतीची हवाच काढली.