Maharashtra

”….त्यामुळे मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

By PCB Author

June 19, 2021

मुंबई, दि. 19 (पीसीबी) : मुंबई महानगरपालिकेच्या करवाढीच्या धोरणावरून भाजपाने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. महापालिकेत मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच पाणीपट्टीत वाढ करण्याचा शिवसेनेचा विचार असल्याचा आरोप करत भाजपाने शिवसेनेला मुंबईचा मतदार धडा शिकवेल, असा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सध्या राखून ठेवलेला असून, पाणीपट्टीत वाढ केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर ट्वीट करत टीका केली आहे. “नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी रिकामी केल्यानंतर आता वसुलीबाज शिवसेनेने पाणीदरात देखील वाढ करण्याचे ठरवले आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी रिकामी केल्यानंतर आता वसुलीबाज शिवसेनेने पाणीदरात देखील वाढ करण्याचे ठरवले आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईचा मतदार शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. pic.twitter.com/bwOvNTGwPh

— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 19, 2021

मुंबईकरांवर १४ टक्के जादा मालमत्ता कर आकारण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला होता. मात्र, हा ठराव अद्याप मंजूर झालेला नाही. करवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला. मात्र, भाजपासह काँग्रेसनंही याला विरोध केला. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत स्थगित केला. प्रस्ताव फेटाळण्यात आलेला नसल्यानं पुढच्या बैठकीत तो मंजूर केला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. दरम्यान, मालमत्ता करवाढीवर मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. मुंबईकरांवर सध्या करोनाचं संकट ओढवलेलं आहे. हे संकट लक्षात घेऊन मालमत्त करात वाढ करणार नसल्याचं महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.