त्याने वाटलेल्या बालाजीच्या प्रसादासह हा दुसराही प्रसाद कोणता ?

0
327

वर्धा, दि. ५ (पीसीबी) – कोरोनाचा प्रसार कुठून कसा होईल ते सांगता येत नाही. हेच पहा ना, आठवड्यापूर्वी तिरुपती येथून नालवाडी येथे आलेला युवक काल 2 जुलै कोरोनाबाधित आढळून आला होता.दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जुलैला त्याची आई आणि आर्वी येथील एक महिला कोरोनाबाधित आढळून आली. दरम्यान, कोरोनाबाधित आलेल्या युवकाने पंचायत समितीतील अनेक अधिकार्‍यांना तिरुपती बालाजीचा प्रसाद वाटला होता. त्यामुळे कोरोनाही फैलवत गेला. आता हा कोरोना शहरात कुठेकुठे पोहोचला हे शोधणे प्रशासनापुढे मोठी कसरत ठरत आहे.

आर्वी आणि वर्धा येथील 36 वर्ष आणि 57 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. या दोन्ही रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या 32 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून त्यांना आर्वी उपजिल्हा रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. कमी जोखमीच्या 52 व्यक्तींना कोविड केअर सेंटरला विलगिकरनात ठेवले आहे. जिल्ह्यात 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 6 रुग्ण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.

पॉझिटिव्ह आलेली आर्वीतील कृषी सहाय्यक असलेली महिला 11 जून रोजी पुण्यातील थेरगाव येथे लग्नासाठी गेली होती. 25 जून रोजी पुण्याहून परत आली. 26 जूनला त्यांना गृह विलगिकरण करण्यात आले. तथापि, तिला ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यामुळे 30 जूनला आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. 1 जुलै रोजी स्त्राव चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये त्या कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालायत कोरोनाच्या उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.