त्याच आवेषाने आणि तडफेने खेळणार – लॅंगर

0
181

मेलबर्न, दि. २४ (पीसीबी) : एक सर्वोत्तम संघ नेहमीच प्रत्येक सामना जिंकण्याच्या उद्देशानेच खेळत असतो. पहिला कसोटी सामना ज्या तडफेने आम्ही खेळलो तोच आवेष दुसऱ्या कसोटी सामन्यातही असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया आणि भारत संघांदरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना नाट्यपूर्ण कलाटणीनंतर जिंकल्यावर त्यांचे मनोधैर्य निश्चितच उंचावले असेल यात शंका नाही. जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांचा भेदक मारा या विजया निर्णायक ठरलो होता. त्यांच्यासमोर कागदावर तुलनेत भक्कम वाटणारी भारतीय फलंदाजी साफ कोसळली होती आणि त्यांचा डाव ३६ धावांत संपुष्टात आला होता.

विराट कोहली आणि महंमद शमी हे दोन प्रमुख खेळाडू भारतीय संघात नाहीत म्हणून आमचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. जेव्हा एखादा संघ सर्वोत्तम असतो, तेव्हा त्यांच्या कमकुवत बाजूही असतात. या कमकुवत बाजू लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करायचे असते. यालाच खेलनिती म्हणतात. आम्ही जिंकण्याच्याच इराद्याने उतरणार. प्रशिक्षक लॅंगर म्हणाले,’ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे ते प्रयत्न अविश्वसनीय होते आणि दुसऱ्या कसोटीत अशीच कामगिरी त्यांनी दाखवावी असे मला वाटते. दुसऱ्या कसोटीत सकाळी आम्हाला चांगली सुरवात करावी लागेल आणि त्या कामगिरीत सातत्य दाखवावे लागेर. कारण, भारतीय संघात मुसंडी मारण्याची क्षमता आहे हे आम्ही जाणतो. अॅडलेडमध्ये पहिले दोन दिवस त्यांनी हे दाखवून दिले. आता ती चूक आम्ही या वेळी करणार नाही.’

डेव्हिड वॉर्नर अजून शंभर टक्के तंदुरुस्त नसल्याने या कसोटीतही खेळू शकणार नाही. त्यामुळे आम्ही पहिल्या कसोटीत खेळलेला संघच कायम ठेवू, असेही लॅंगर यांनी सांगितले. सहाजिकच ज्यो बर्न्स आणि कॅमेरुन ग्रीन यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल, तर वेड आपली योग्यता सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी भारतीय संघ मात्र संघात अमुलाग्र बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विराट कोहली भारतात परतल्यामुळे आणि शमी जखमी असल्यामुळे दोन जागा यापूर्वीच मोकळ्या आहेत. त्याचवेळी अपयशी पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा यांना वगळले जाऊ शकते. शुभमन गिल, लोकेश राहुल, रिषभ पंत, महंमद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान मिळू शकते. मेलबर्न येथे कसोटी सामन्यासाठी रोज ३० हजार प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.