“त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन”; पक्षप्रवेशा दरम्यान एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा

0
202

मुंबई, दि.२३(पीसीबी) : एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये त्यांना आलेल्या कटू अनुभवांना वाचा फोडत आतापर्यंत केलेल्या आरोपांचा पुर्नरुच्चार करत खडसे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

”४० वर्षे पक्षात राहिल्यानं पक्ष सोडावा असं कधी वाटलं नाही. माझी छळवणूक झाली सर्वांनी पाहिली. मी वारंवार त्याबाबत विचारत होतो. सभागृहात सांगा, भ्रष्टाचार झाला, तर कागदपत्रं द्या, बऱ्याच वेळा विचारलं पण त्याचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही. मी खूप संघर्ष केला. भाजपामध्ये आणि मंत्रिमंडळातही संघर्ष केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला,” असं राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर बोलताना खडसे म्हणाले,

पुढारी खडसे अशी म्हणाले कि, “संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की माझा किती छळ झाला, अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारलं की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा असंही म्हटलं. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपामध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाला ६ खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने ५ जागा जिंकून आणल्या. ४० वर्षात बाईला समोर ठेवून कधीच राजकारण केलं नाही,” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसेंनी टोला लगावला.

“ज्यावेळी मी राष्ट्रवादी प्रवेश करण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांशी चर्चा करत होतो. तेव्हा एकदा जयंत पाटील यांच्यासोबत एकदा बोलत होतो. तेव्हा जयंत पाटील मला म्हणाले की, ‘तुम्हाला राष्ट्रवादी यायचं आहे. पण त्यांनी तुमच्यामागे ईडी लावली तर काय?’ जयंत पाटलांना मी म्हणालो त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावेन,” असं सांगत खडसे यांनी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला.