“तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा”

0
223

मुंबई,दि.२३(पीसीबी) – तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.

भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. काही दिवस जाऊद्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईन. नियमाच्या बाहेर जे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजकीय जीवनातून घरी बसण्याचीच तयारी केली होती. भाजपाला हेच वाटत होतं, कारण मला भाजपा तर काही देणार नाही. तिकिट मागितलं तर म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहे. नाथाभाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे ना.. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे.