Banner News

ते ४३ कर्मचारी विधानसभा निवडणूकीनंतरच महापालिकेत हजर होणार

By PCB Author

August 08, 2019

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – विविध निवडणूकीच्या कामासाठी इतर सरकारी कार्यालयात गेलेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे ४३ कर्मचारी सहा महिने ते सहा वर्षापासून पालिकेतून गायब आहेत. ते सर्व कर्मचारी विधानसभा निवडणूकीनंतरच महापालिकेत हजर होणार आहेत. अशी माहिती प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

महापालिकेचा पगार घेऊन इतर कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला.  अशा कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता होती. मात्र, असे एकुण ४३ कर्मचारी असल्याचे सांगत त्यांची नावे प्रसिद्ध करण्याची गरज नसल्याचे लोणकर यांनी सांगितले.

लोणकर म्हणाले की, निवडूकीच्या कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत आणण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, निवडूक आयोगाने त्यांना सोडले नाही. आता त्यांना विधानसभा निवडूकीनंतरच महापालिकेत हजर करून घेता येईल.

कर्मचारी त्या कार्यालयात का रमलेत

निवडणूकीचे काम संपल्यानंतर संबंधित कर्मचारी त्या त्या कार्यालयात रूजू होतात. मात्र, महापालिकेतील ४३ कर्मचारी सहा महिने ते सहा वर्षापासून इतर सरकारी कार्यालयात रमले आहेत. प्रत्येक महिन्याला या कर्मचाऱ्यांची त्या कार्यालयातील हजेरी महापालिकेत येते आणि महापालिका त्यांच्या खात्यावर पगार जमा करते. ते कर्मचारी नक्की त्या कार्यालयात हजर असतात का, त्यांनी तेथील एखाद्या अधिकाऱ्याला हाताशी धरून बोगस हजेरी पाठवली नाही ना, अशी कोणतीही शक्यता पडताळून पाहिली जात नाही. असे काहींचे म्हणणे आहे.