Desh

तेलंगणातील ऑनर किलिंग प्रकरणी धक्कादायक खुलासे; आरोपींचा आयएसआय आणि माजी मंत्री हरेन पांड्या खूनाशी संबंध

By PCB Author

September 18, 2018

नालगोंडा, दि. १८ (पीसीबी) – तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१४) रुग्णालयाबाहेर गर्भवती प्रेयसीसमोर प्रियकराचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला होता. या ऑनर किलिंगचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश आले असून खूनातील आरोपींचे थेट पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि गुजरात येथील माजी मंत्री हरेन पांड्या यांच्या खूनाशी संबंध असल्याचे समोर आले आहे.  

प्रणय कुमार (वय २३, रा. नालगोंडा) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील सात आरोपींना बिहारमधून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी प्रणय कुमार नालगोंडा जिल्ह्यातील रुग्णालयातून पत्नी अमृतासोबत बाहेर पडला. त्यावेळी मारेकरी तिथे आला व त्याने धारदार शस्त्राने वार करुन प्रणयची हत्या केली. प्रणय कुमार याचा खून करणाऱ्या टोळीचे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. प्रणयचा खून करण्यासाठी सात जणांच्या गँगला १ कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती. मारेकऱ्यांना त्या रक्कमेपैकी १८ लाख रुपये मिळाले होते. मुख्य मारेकरी गुजरातमधील माजी मंत्री हरेन पांडया यांच्या हत्येमध्येही सहभागी होता.

अमृताने पोलिसांना दिलेल्या जबानीत तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता. मारुती राव रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहेत. श्रीमंत-प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रणयशी लग्न केले होते. माझ्या कुटुंबाकडून धोका असल्यामुळे काही काळ आम्ही लपूनही राहिलो होतो. पण अशा प्रकारे खून करतील अशी अपेक्षा केली नव्हती.