तेलंगणमध्ये राष्ट्रवादी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार  

0
1120

गडचिरोली, दि. २० (पीसीबी) – तेलंगणमध्ये विधानसभेच्या ११९ तर लोकसभेच्या १७ जागा आहेत. या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.  बुधवारी (दि.१९) त्यांनी हैदराबादेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेलंगणातील विस्तारासाठी प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा केली. धर्मरावबाबा यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेलंगण, हैदराबाचे प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणचा दौरा केला होता. त्यानंतर मंगळवारी (दि.१८) शरद पवार यांनी धर्मरावबाबा यांच्याकडे तेलंगणसह आंध्रप्रदेशची  प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचा बहुतांश भाग तेलंगणला लागून आहे. धर्मरावबाबांना तेलुगू भाषा चांगलीच अवगत आहे. तेलंगणच्या राजकारणाचा अभ्यास असल्याने  पवार यांनी धर्मरावबाबाकडे दोन राज्यांची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, धर्मरावबाबा हे अहेरीचे माजी आमदार असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सिरोंचा विधानसभा मतदारसंघाचे ते तीनवेळा निवडून आले आहेत. माओवाद्यांनी त्यांचे अपहरण करून १५ दिवस ओलीस ठेवले होते. जहाल माओवादी विकाअण्णाची सुटका केल्यानंतर धर्मरावबाबा यांना सोडण्यात आले होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.