Desh

‘तेजस’ लढाऊ विमानातून राजनाथ सिंहांचे उड्डाण

By PCB Author

September 19, 2019

बेंगळुरू, दि. १९ (पीसीबी) – शत्रूंना धूळ चारण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केले. तेजसमधून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारताचे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) पाकिस्तान आणि चीनच्या लढाऊ विमानांपेक्षा वरचढ ठरत आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात याआधीच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. डीआरडीओच्या अॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं तेजसचे डिझाइन केले आहे. हिंदुस्तान अॅरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे.

तेजसमध्ये निश्चित लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास हे लढाऊ विमान सक्षम आहे, असे एअर चीफ मार्शल धनोआ यांनी सांगितले. अन्य लढाऊ विमानांच्या तुलनेत तेजस वजनाने हलका आहे. त्याचे वजन साधारण ६५६० किलो आहे. ५० हजार फूट उंचावर उड्डाण करू शकते. त्याचे पंख ८.२ मीटर रुंद आहेत. तर लांबी १३.२ मीटर आणि उंची ४.४ मीटर आहे.