Desh

तू देशाऐवजी पैशाला प्राधान्य दिलेस; शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर बोचरी टीका

By PCB Author

June 08, 2019

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – २०१९ विश्वचषक स्पर्धेत फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आपल्या पहिल्या ३ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काही दिवसांपूर्वी आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हीलियर्सने आफ्रिकन क्रिकेट बोर्डाकडे निवृत्ती मागे घेत, विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी देण्याची मागणी केली होती अशी बातमी समोर आली होती. आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने साहजिकच डिव्हीलियर्सची मागणी फेटाळली. आता याच मुद्द्यावरुन पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने डिव्हीलियर्सवर बोचरी टीका केली आहे.

डिव्हीलियर्सने देशाऐवजी पैशाला प्राधान्य दिल्याचा आरोप शोएब अख्तरने केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा डिव्हीलियर्सचा निर्णय हा केवळ आर्थिक लाभ डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय होता. स्पर्धेत जेव्हा आफ्रिकेचा संघ खराब कामगिरी करतो आहे, तेव्हाच ही बातमी समोर येण्याचे कारण काय आहे? अख्तरने डिव्हीलियर्सला आपल्या टिकेचे लक्ष्य केले.

यापुढे बोलत असताना शोएब अख्तरने, डिव्हीलियर्सवर पीएसएल आणि आयपीएल स्पर्धांना सोडून विश्वचषकासाठी तयार रहावं अशी अट घालण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र डिव्हीलियर्सने विश्वचषकाआधीच वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे या सर्व गोष्टी पैशाशी निगडीत असल्याचं शोएब म्हणाला. सलामीच्या सामन्यात आफ्रिकेला यजमान इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बांगलादेश आणि भारतानेही आफ्रिकेवर मात केली.