तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नाही – एकनाथ खडसे

0
339

नवी मुंबई,दि.१५(पीसीबी) – तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नसल्याचं मत एकनाथ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री खडसेंनी व्यक्त केलं आहे. ते भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनात बोलत होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून १५ आणि १६ फेब्रुवारीला नवी मुंबईत हे अधिवेशन घेतलं जात आहे. एकनाथ खडसे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं आहे.

“महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मतांतरं आहेत. आता ही मतांतरे उघडपणे होत असून वाढायला लागले आहेत. या अंतर्गत विरोधामुळेच हे सरकार मोडेल. असं असलं तरी मध्यावधी निवडणूक तूर्त होतील असं मला वाटत नाही. त्यांनाही काही काळ द्यावा लागेल. मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रीय आहे.” असं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं होतं. त्यांनी भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी करणार असल्याचं वक्तव्यं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचं मध्यावर्ती निवडणुकांवरील हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.