तूर्तास टीआरपी मूल्यमापनाला स्थगिती

0
261

मुंबई,दि.१५(पीसीबी) – पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने (BARC) मोठा निर्णय घेतला आहे. बार्कने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं आहे.

बार्कच्या निर्णयाचं न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून (NBA) स्वागत करण्यात आलं आहे. बार्कने योग्य दिशेने पाऊल टाकलं असल्याची प्रतिक्रिया एनबीएकडून देण्यात आली आहे. बार्कने हा १२ आठवड्यांचा अवधी आपल्या पूर्ण यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तसंच देशात काय पाहिलं जातं यासंंबंधी विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी वापरावा असं मत बार्कने व्यक्त केलं आहे.

बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सील (बीएआरसी ज्याला बार्क असंही म्हणतात) इंडिया नावाचा एक संयुक्त उद्योग उपक्रम आहे. हा उपक्रम प्रसारणकर्ते (आयबीएफ), जाहिरातदार (आयएसए) आणि जाहिरात तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्थेचे (एएएआय) प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून हाताळला जातो. टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे. बीएआरसी इंडिया सन २०१० मध्ये सुरु करण्यात आली. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवणाऱ्या वाहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.