‘तुला मूल होत नाही म्हणून घटस्फोट दे’ असं म्हणत विवाहितेचा केला छळ; विवाहितेने तक्रार देताच…

0
375

आळंदी, दि.12 (पीसीबी) : लग्नाच्या वेळी ठरवलेल्या रकमेतील उर्वरित सहा लाख रुपये माहेरहून घेऊन ये म्हणत विवाहितेला मूल होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी तिचा छळ केल्याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सासरच्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती हनुमंत वसंत लहाने, सासू गोदावरी वसंत लहाने, सासरा वसंत भगवान लहाने, मोठा दीर अर्जुन वसंत लहाने (सर्व रा. हनुमानवाडी केळगाव, ता. खेड. मूळ रा. पाटोदा गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सन 2014 ते 9 जानेवारी 2021 या कालावधीत घडला. विवाहितेच्या लग्नाच्या वेळी आरोपींनी मागणी केलेल्या पैशांपैकी राहिलेले सहा लाख रुपये माहेरहून घेऊन येण्याची आरोपींनी मागणी केली. पैसे न दिल्याने वैवाहितेचा शारीरिक व मानसिक चाल केला. पती हनुमंत याने ‘तुला मूल होत नाही म्हणून घटस्फोट दे’ असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.