Pimpri

तुला पाठवलेले गिफ्ट दिल्ली विमानतळावर आले असल्याचे सांगत सोशल मीडियावरील मित्राने तरुणीला घातला गंडा..

By PCB Author

December 31, 2021

दिघी, दि. ३१ (पीसीबी) – ‘तुला गिफ्ट पाठवले आहे. ते दिल्ली विमानतळावर आले आहे. त्यात पाउंड करन्सी आहे’ असे खोटे सांगून ते पैसे कस्टमने बघितले तर तुला अटक होऊ शकते, असे घाबरवून तरुणीला एका बँक खात्यावर सहा लाख 93 हजार 500 रुपये पाठवण्यास सांगितले. सोशल मीडियावर झालेल्या मित्राने तरुणीला अशा ब्लॅकमेल करून गंडा घातल्याचा प्रकार मे 2021 मध्ये गणेशनगर कॉलनी बोपखेल आणि विश्रांतवाडी येथ घडला.

 

शिल्पवृंदा रवींद्र कोडापे (वय 29, रा. गणेशनगर कॉलनी, बोपखेल) यांनी याप्रकरणी 30 डिसेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पॅट्रिक एडिसन नावाचा इंस्टाग्राम अकाउंट 447459413791 क्रमांक धारक, 7800346931 क्रमांक धारक जेम्स, स्टेट बॅक ऑफ इंडीयाचा खाते क्रमांक 39524781274 धारक इमरान सरकार, शितल बंडगर हे अकाउंट असलेली व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे ते 24 मे 2021 या कालावधीत पॅट्रीक एडीसन याने इंस्टाग्राम व व्हाटसअपवर फिर्यादिला मेसेज करुन त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीला गिफ्ट पाठवल्याचे खोटे सांगून त्याचा साथीदार जेम्स याने फिर्यादीचे गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टमला आले असल्याचे सांगितले. त्यात पाउंड करन्सी असल्याचे खोटे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांवर मनी लॉण्डरिंगची केस होईल, पोलीस फिर्यादीला अटक करणार असे सांगून फिर्यादीला ब्लॅकमेल केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचा खातेदार इमरान सरकार नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर फिर्यादीला सहा लाख 95 हजार 500 रुपये पाठवण्यास भाग पाडले. याप्रकरणी तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे तपास करीत आहेत.