Pimpri

तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू; अमोल कोल्हेंचा भाजपाला इशारा

By PCB Author

November 22, 2020

पिंपरी,दि.२२(पीसीबी) – पुणे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित पिंपरी-चिंचवडमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ही घणाघाती टीका केली.

काल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करायची नाही. पण शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशी टीका करतानाच तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा कोल्हे यांनी दिला. देशात त्यांचा वरचष्मा आहे असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. तसेच विधान परिषदेच्या जागा जिंकण्यासाठी जे करता येईल ते करा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावर कोल्हे यांनी पलटवार केला आहे.