“तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात मात्र, उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत….” ; मुख्यमंत्र्यांचं खरमरीत राज्यपालांना उत्तर

0
375

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉरचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे. त्यावर उत्तराखंडमध्ये नेमकं काय चाललं आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात. उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत दीडशे टक्क्याने वाढ झाली आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आरसाच दाखवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दीर्घ पत्रं लिहिलं आहे. त्यात महिला अत्याचाराचा मुद्दा कसा देशव्यापी आहे आणि उत्तराखंडची स्थिती काय आहे यावर चर्चा केली आहे. उत्तराखंड ही तर देवभूमीच म्हणावी लागेल. आपण स्वतः या देवभूमीचे सुपूत्र आहात. मुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेतृत्व आपण केले आहे. उत्तराखंडच्या देवभूमीचा महिलांवरील अत्याचारांचा आलेख देखील चढता आहे. देवभूमीत महिलांवरील अत्याचारांत दीडशे टक्क्यांनी वाढ झाल्याचे सरकारी आकडेच सांगत आहेत. हरिद्वार, डेहराडूनसारख्या शहरांत महिलांवरील बलात्कार, हत्येचे गुन्हे सतत वाढत आहेत. हुंडाबळी, महिलांच्या अपहरणाचे गुन्हेही वाढत आहेत. यावर काय उपाय योजना करावी बरे? तेथेही विधिमंडळाचे खास सत्र बोलवू शकतो काय?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे जुळे भावंड असलेल्या गुजरातशी आमचे एक भावनिक नाते आहे, पण गुजरात मॉडेलमध्ये महिला खरेच सुरक्षित आहेत काय? गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच रोज 14 महिलांवर बलात्कार, यौन शोषणसारख्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही काळात अहमदाबादमधून 2908 महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून 14 हजार 229 महिला बेपत्ता झाल्या. 2015 सालापासून गुजरातमध्ये महिलांवरील निर्घृण अत्याचारांनी टोक गाठले आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

17 एप्रिल 2021 रोजी अहमदाबादमधून एका 25 वर्षांच्या महिलेस पळवून बलात्कार व हत्या करण्यात आली. या महिलेवर सामुदायिक बलात्कार केल्याचे पोस्टमार्टेम अहवालात सिद्ध झाले. मेहसाणा, राजकोट, वडोदरा, अहमदाबाद ग्रामीण, छोटा उदयपूर, सूरत ग्रामीण, जामनगर, पाटण भागातील महिलांवरील बलात्कार व अत्याचाराचे गुन्हे तसेच आकडे धक्कादायक आहेत. आकडे सांगतात, गुजरातमध्ये रोज 3 बलात्काराच्या घटना घडतात. यावर चर्चा करायची म्हटले तर गुजरात विधानसभेत एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. छत्रपतींनी त्यांच्या हिंदवी स्वराज्यात महिलांच्या सुरक्षेस नेहमीच प्राधान्य दिले. हे नव्याने सांगायला नको. स्वराज्यातील तसेच शत्रूंच्या स्त्रियांचाही छत्रपती शिवरायांनी योग्य तो आदर ठेवला आणि त्यांना सन्मानाने वागवले. त्याचबरोबर स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांची त्यांनी कधीच गय केली नाही. महाराष्ट्राचे सध्याचे सरकार शिवरायांच्या त्याच परंपरेची पताका घेऊन पुढे निघाले आहे. राज्यपाल तसेच वडिलधारे म्हणून आपले आशीर्वाद आम्हाला मिळावेत, ही अपेक्षा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.