तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, अजित पवार यांचा पोलिस आयुक्तांना आदेश

0
1056

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकऱणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुठल्याही चुकिचे समर्थन नाही, अशी अगदी रोखठोक भूमिका घेतली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी बोलताना, तुम्ही तुमच्या पध्दतीने काम करा, जी रितसर कारवाई असेल ती करा, असे म्हणत अजितदादा पवार यांनी एक प्रकारे पक्षातीलच नाही तर सर्व नेत्यांनाही संदेश दिला आहे.

पुणे येथे विधानभवनात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठक ओयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आयुक्त कृष्ण प्रकाश यांनाही बोलावून घेण्यात आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या बरोबर आमदार बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि त्यांचे सहकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलिस आयुक्तांनी वस्तुस्थिती अजित पवार यांच्या समोर ठेवली. गोळीबाराची घटना आणि तत्पूर्वी कामगारांना झालेली मारहाण, नंतर तानाजी पवार यांना रक्तबंबाळ होई पर्यंत आमदार बनसोडे यांच्या समर्थकांनी केलेली मारहाण असा घटनाक्रम आणि त्यातील पुरावे वगैरे तपशिल पाहिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरळ हात वर केले. या विषयावर तुमच्या पद्धतीने काम करा, असे स्पष्ट करून त्यांनी आमदार बनसोडे यांच्या कृत्याचे समर्थन करणे टाळले. अजित पवार यांच्या आदेशामुळे आता पोलिस आयुक्त यापुढे कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागूण राहिले आहे.

दरम्यान, आमदार बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकऱणात तानाजी पवार यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोशी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे कचरा वेचक कंपनी कामगारांना बेदम मारहाण प्रकरणात आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह १५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या दोन स्वतंत्र गुन्ह्याची नोंद आहे. आता पोलिस आयुक्त सिद्धार्थ बनसोडे याला अटक करतात का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.