तुम्हीच सांगा, मी काश्मीरला कधी येऊ?; राहुल गांधींचा राज्यपाल मलिकांना सवाल   

0
490

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्यात आले आहे. यावर अनेक मतमतांतरे व्यक्त होत असताना मी काश्मीरमध्ये येऊन सामान्यांना कधी भेटू?  असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मीरचे राज्यपाल  सत्यपाल मलिक यांना ट्विट करून केला आहे.     

भाजप सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर   काश्मिरमध्ये हिंसाचार होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष द्यावे, असे ट्विट राहुल गांधी यांनी  केले होते.  त्यावर काश्मीरमध्ये येऊन राहुल गांधी यांनी जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे  सत्यपाल मलिक यांनी  म्हटले होते. तसेच त्यांच्यासाठी विशेष विमानही पाठवण्यास आम्ही तयार आहोत, असेही  त्यांनी म्हटले होते.  त्यावर राहुल गांधी यांनी  पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मलिकजी मी काश्मीरमध्ये येऊन तेथील लोकांना कोणत्याही निर्बंधांशिवाय भेटायचे तुमचे आमंत्रण स्वीकारतो. तुम्हीच सांगा मी कधी येऊ?’  तसेच विमानाची काहीच गरज नाही. आम्हाला लोकांना भेटू द्या, असेही गांधी यांनी म्हटले आहे. आता यावर मलिक काय उत्तर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.