‘तुझी आजी वारल्याचे आम्हाला का सांगितले नाही’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण

0
1551

बावधन, दि. १० (पीसीबी) – ‘तुझी आजी वारल्याचे आम्हाला का सांगितले नाही’, अशी विचारणा करीत दोन आतेभावांनी आपल्या साथीदारांसह तरुणास लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी बावधन येथे घडली.

रोहन रमेश जाधव (वय 22, रा. माळी आळी, बावधन, पुणे) यांनी रविवारी (दि. 9) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राम शाम पवार आणि गणेश शाम पवार (दोघेही रा. मथुरा निवास, बावधन, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम आणि गणेश हे दोघेजण फिर्यादी रोहन यांच्या आत्याची मुले आहेत. रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांना बावधनमधील बापूजी बुवा मंदीराजवळ अडविले. ‘आजी वारल्याचे आम्हाला का सांगितले नाही. तुला लई माज आला आहे काय’, असे म्हणत शिवीगाळ केली. ‘तुला नेऊन मारूनच टाकतो’, अशी धमकी देत आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली. यात रोहन हे जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.