तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन; आकुर्डीत मुक्काम, शनिवारी पुण्याकडे प्रस्थान

903

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उद्योगनगरीत आगमन झाले. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामासाठी पोचली. शनिवारी (दि. ७) सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था आणि संघटनांनी पालखीचे शहरात जोरदार स्वागत केले. त्याचप्रमाणे पालखीत सहभागी वारकऱ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालखीत सहभागी दिंडीप्रमुखांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.

आषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या ओढीने संत तुकोबांच्या पालखीचे गुरूवारी (दि. ५) देहूगावातून प्रस्थान झाले. त्यानंतर तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला. शुक्रवारी (दि. ६) सकाळी पालखीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ पालखीचे आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी चौकात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने भक्ती-शक्ती शिल्पसमूहालगत स्वागत कक्ष उभारला होता. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले.

यंदा प्रथमच महापालिका नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री खरेदी करून पालखीत सहभागी ३५० दिंडीप्रमुखांना भेट स्वरूपात देण्यात आले. यावेळी देहू संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी पोचली. यावेळी आकुर्डी ग्रामस्थ व पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीचे स्वागत केले. आकुर्डीतील मुक्कामानंतर शनिवारी (दि. ७) सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी सर्व व्यवस्था आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांना शाळा उपलब्ध करून देण्यासह विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठाविषयक सुविधा देण्यात आल्या आहेत.