तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात नाशिककर रस्त्यावर; तर भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

0
475

नाशिक, दि. २२ (पीसीबी) – करड्या शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची   नाशिकच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली.  या बदलीविरोधात  नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक नागरिकांनी आज सकाळी (गुरूवार) मुंढेंच्या बदलीला विरोध करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

मुंढेंच्या समर्थनासाठी जमलेल्या नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वाराचा परिसर ‘वुई वॉन्ट मुंढे’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. बुधवारी  सुट्टी असतानाही मुंढेंची बदली कशी करण्यात आली ? असा सवाल  यावेळी  नागरिकांनी  केला.  तर भाजप सरकार मुजोर सरकार आहे, अशा शब्दांमध्ये   रोष व्यक्त केला.

दरम्यान  मुंढेंच्या बदलीला विरोध करणाऱ्या आपच्या काही कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पोलिसांनी अटक केली. तर, दुसरीकडे मुंढेंची बदली झाल्याने  भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आज सकाळी महापौर निवासस्थानी रामायण बंगला येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.