Maharashtra

तुकाराम मुंढेंच्यामागे शुक्लकाष्ठ; कमी महत्त्वाच्या पदावर पुन्हा बदली  

By PCB Author

December 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यामागे बदलीचे शुक्लकाष्ठ कायम आहे. त्यांची मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून  नियुक्ती  करण्यात आली होती. मात्र,   या पदाचा त्यांनी पदभार स्विकारला नव्हता.  त्यामुळे मुंढे यांची पुन्हा एकदा   मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून  बदली  करण्यात आली आहे. त्यामुळे साईड पोस्टींग केल्याने या पदाचा मुंढे पदभार स्वीकारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुंढेंची कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली आहे. याआधी नाशिक महापालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून महिनाभरापूर्वी बदली करण्यात आली होती. मात्र त्या पदाचा पदभार मुंढे यांनी स्वीकारला नव्हता. त्यामुळे सरकारने त्यांची पुन्हा एकदा बदली केली आहे.

तुकाराम मुंढे यांची प्रशासनात शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख  आहे. त्यांची बदली कोठे ही झाली तरी त्यांच्या कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवतात. मुंढे ज्या ठिकाणी जातात. त्या तेथील  अधिकारी, कर्मचारी आणि राजकारण्यांचे धाबे दणाणतात.  दरम्यान मुंढे यांची नियोजन विभागात केलेल्या बदलीवर  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यकत् केली होती. त्यामुळेच मुंढे यांची येथून बदली केल्याचे  बोलले जात आहे.