तुकाराम मुंढेंची साखर आयुक्तपदी नियुक्ती करा; शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0
642

कोल्हापूर, दि. ३ (पीसीबी) – धडाकेबाज आणि कर्तबगार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष व  ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊस दर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष असलेल्या मुख्य सचिवांकडे  पत्रादवारे  केली आहे.

राज्यातील साखर कारखानदारावर प्रशासनाचा वचक नसल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. साखर उद्योगाच्या माध्यमातून राजकारणात प्रस्थापित असलेली ही मंडळी शेतकऱ्याला दर देताना  टाळाटाळ करत आहे.  साखर उद्योगाला सरकारकडून वेळोवेळी पॅकेज दिले जाते. मात्र त्याचा वापर  शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठी केला जात नाही. साखर कारखानदार हे  सरकारला जुमानत  नाहीत, असे या पत्रात म्हटले आहे.

साखर उद्योग डबघाईला जाण्यापूर्वी त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठीच तुकाराम मुंढे यांची  साखर आयुक्‍तपदी नियुक्ती करावी, असे प्रल्हाद इंगोले यांनी पत्रात म्हटले आहे. मुंढे यांच्याकडे  साखर आयुक्तपदाची धुरा दिल्यास साखर उद्योगातील भ्रष्टाचाराला चाप बसेल. तसेच शिस्त लागेल,’ असे  या पत्रात म्हटले आहे.