तुकाराम मुंढेंची मंत्रालयात बदली; नियोजन विभागाची जबाबदारी

0
945

नाशिक, दि. २४ (पीसीबी) – नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आज (गुरूवार) बदलीचे पत्र मिळाले. त्यांची मंत्रालयात नियोजन विभागात सह सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंढे यांच्या जागी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेच्या सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी मुंढे यांना हटवण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्यावर अविश्वास ठरावदेखील आणण्याची तयारी झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद् फडवणीस यांनी हस्तक्षेप केल्याने भाजप नगरसेवकांना अविश्वास ठराव मागे घ्यावा लागला होता. त्यानंतरही मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर सत्ताधाऱ्यासह विरोधी नगरसेवकांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अखेर मुंढे यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंढे यांची बारा वर्षातील ही अकरावी बदली आहे. तर त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. याआधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. तत्पूर्वी ते नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर होते. त्याआधी त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. तर बुधवारी मुंढे यांची उस्मानाबाद जिल्हाधिकारी पदावर बदली झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर उठवल्या जात होत्या.