Pune

तुकाराम मुंडे यांना हटविण्यासाठी भाजपा व कांग्रेसची हात मिळवणी

By PCB Author

May 29, 2020

नागपूर, दि. २९ (पीसीबी) :-राज्यात कोरोनाच्या संकटामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकार पडण्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मध्ये भाजपा आणि काँग्रेस हातात हातघालून महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना हटविण्यासाठी एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर मध्ये मात्र भाजपा आणि कांग्रेसची हात मिळवणी हा राजकीय चर्चेचा विषय आहे.

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात असंतोष वाढू लागला आहे. मुंढे यांची कार्यपद्धती ही हुकूमशहाची असून ते लोकप्रतिनिधींना विश्वासातच घेत नाहीत असा आरोप सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांनी केला. गरज पडली तर सगळेच पक्ष मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणतील असं आज भाजप आणि काँग्रेसने जाहीर केलं. शहरात कोरोनाची साथ पसरत असताना महापालिकेत मुंढे विरुद्ध सर्व नगरसेवक असा वाद निर्माण झाला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या भूमिकेत महापालिका सत्ता पक्ष व विरोधी पक्षाने नागपुरात आज एकत्र बैठक घेत एल्गार पुकारला आहे. गुरुवारी नागपुरात तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाही च्या विरोधात भाजपचे सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, व काँग्रेस चे विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांनी संयुक्त परिषद घेऊन, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एक तर्फी कारभार व जनप्रतिनिधी ला काहीही न विचारता मनमानी करण्याचा आरोप करत एका प्रकारे हुकूमशहाच्या भूमिकेत कार्य करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यात लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केली.