‘ती माझ्यासोबत नेपोटिझम कार्ड खेळू शकत नाही’, तापसीचे रंगोलीला उत्तर

0
452

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – सडेतोड वक्तव्य आणि बोचऱ्या मतांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाच्या आगामी ‘जजमेंटल है क्या ?’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाल्यापासून कंगना सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. त्यातच काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियाच्या माध्यमातून या ट्रेलरचे कौतुक केले होते. मात्र तापसीचे हे ट्विट कंगनाची बहिण रंगोलीला पटले नसून तिने तापसीला ‘सस्ती कॉपी’ असे म्हटले होते. त्यानंतर तापसीनेही रंगोलीला सडेतोड उत्तर दिले होते. मात्र तेव्हापासून या दोघींमध्ये शितयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तापसीने पुन्हा एकदा या विषयावर भाष्य करत रंगोलीला उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीमध्ये तापसीने या प्रकरणी तिचे मत स्पष्टपणे मांडत रंगोलीला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले. “त्यावेळी केवळ अनुराग कश्यपच नाही, तर कलाविश्वातील अनेक जण माझ्या बाजूने उभे राहत रंगोलीला उत्तर देण्यास तयार होते. मात्र मीच त्यांना असे करण्यापासून थांबविले. हे प्रकरण आणखी वाढू नये अशी माझी इच्छा नव्हती. कारण आज मी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. त्यामुळे कोणीही माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करु नये, माझ्यासोबत नेपोटिझम कार्ड खेळू नये अशी माझी इच्छा होती”, असे तापसी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मला शाब्दिक वादामध्ये अडकायचं नाहीये. कारण ती ज्या पद्धतीने बोलते, तसे मी बोलू शकत नाही आणि हा सस्ती कॉपीचा मुद्दा आहे, तर हो ती जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे, तर मी ‘स्वस्त’ अभिनेत्री आहे. आम्ही दोघी आमची मत ठामपणे मांडणाऱ्या व्यक्ती आहोत, मात्र कधी कधी याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. तो ट्रेलर पाहून मी मनापासून कौतुक केले होते. माझ्या मनात तिचा अपमान करावा असा विचारदेखील नव्हता.”

दरम्यान, रंगोलीने तापसीवर टीकेची झोड उठविल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप तापसीच्या मदतीला धावला होता. ‘हे जरा अति होते आहे आणि तू जे काही बोलते आहेस ते निराशा करणारे आहे.’ या आशयाचे ट्विट अनुराग कश्यपने केले होते.