तीन वर्षांपुर्वी बेपत्ता झालेल्या मुलीच्या नावे खंडणीचा फोन; पोलीसही हैराण

0
405

नोएडा, दि. १५ (पीसीबी) – नोएडाचे रहिवासी असणारे संजय रावत यांना ८ जुलै रोजी एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे मुलगी सुरक्षित परत करण्यासाठी खंडणीची मागणी केली. या फोनमुळे अस्वस्थ झालेल्या संजय रावत यांनी कोणताही पालक त्याक्षणी करेल तेच केले आणि पोलीस स्टेशन गाठले. पण संजय रावत यांनी काळजी वेगळी होती. कारण त्यांची मुलगी कशीश तीन वर्षांपुर्वी बेपत्ता झाली होती.

चार वर्षांची कशीश रावत घरासमोरुनच २०१६ रोजी बेपत्ता झाली होती. आता एक अनोळखी व्यक्ती फोन करुन त्यांच्याकडे खंडणी मागत आहे. संबंधित व्यक्ती वारंवार फोन करत असून मुलीच्या बदल्यात खंडणी मागत असल्याचे कुटुंबाने सांगितले आहे. मुलगी जिवंत हवी असेल तर १० लाख रुपये द्या अशी धमकी त्याने दिली आहे. कशीशच्या वडिलांनी नोएडा पोलिसांकडे मदत मागितली असून तक्रार दाखल केली आहे.

संजय रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबाला ८ जुलै ते १० जुलै दरम्यान अनेक फोन आले. दिवसाला जवळपास १० फोन करुन संबंधित व्यक्ती कुटुंबाला त्रास देत आहे. फोन करणारी व्यक्ती प्रत्येक फोन वेगवेगळ्या नंबरवरुन करत आहे. “माझी मुलगी कशीश पंजाबमध्ये असल्याचे कॉलरने सांगितले आहे. जर मुलगी जिवंत हवी असेल तर १० लाख रुपये द्या अशी धमकी त्याने दिली आहे”, अशी माहिती संजय यांनी दिली आहे.