तीन राज्यांत थैमान; देशभरात वादळी पावसाचे ३१ बळी

0
486

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – देशात अनेक राज्यांमध्ये गेले ३-४ दिवस वादळी वाऱ्यांसह बरसणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेषत: मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातला पावसाने झोडपले आहे. देशभरात या मुसळधार पावसाने ३१ बळी घेतले आहेत.

राजस्थानात वादळी पावसामुळे ९ जण मृत्युमुखी पडले तर मध्य प्रदेशात १० जणांचा पावसाने बळी घेतला आहे. अजूनही पावसाचे सावट कमी झालेले नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये हवामान विभागाने वादळाचा अलर्ट जारी केला आहे.

मध्य प्रदेशातली झाबुआ येथे अचानक हवामान बदलले आणि पावसाचा कहर बरसला. परिणामी वीज कोसळल्याने १० जण दगावले. राजस्थानात ९ जण मृत्युमुखी पडले तर २० जण जखमी झाले. सर्वाधिक वाताहत उदयपूर आणि झालावड येथे झाली. उदयपूरमध्ये विजेचे ८०० खांब आणि ७० ट्रान्सफॉर्मर कोसळले.

गुजरातमध्ये पावसाने ९ बळी घेतले. अहमदाबाद, राजकोट, पाटन, महेसाणा, साबरकांठा, आणंद भागात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.